Friday, April 8, 2011

एक होता मराठी माणूस

एक होता मराठी माणूस
पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # फेब्रुवारी-२०१०

फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट. आट पाट नगर होते. त्या नगरीचे नाव होते मुबई. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी होती. तिनही बाजूनं समुद्रानं कवेत घेतलंल्या या नगरीत पुर्वी कोळी, आगरी, पाचकळशी लोकांचं वास्तव्य असायचं. मुख्यत्वे मराठी नावाचा माणूस इथे रहात होता. ताडा-माडा-झाडांनी वेढलेल्या या नगरीत ती माणसं सुखा-समाधानानं रहात होती. शेती, मासेमारी हे त्यांचे पोटापाण्याचे व्यवसाय. पुढे इंग्रजाच्या काळात मुंबईतला व्यापार-उदीम वाढला. त्यासाठी कामगारांची, दुकानदारांची, छोटया-मोठया व्यावसायीकांची गरज भासायला लागली. त्यासाठी राज्यातील इतर भागातून, देशातल्या इतर राज्यातून माणसं मुंबईत स्थलांतरीत होऊ लागली. स्थाईक व्हायला लागली. कामगारांच्या, कष्टकरांच्या वस्त्या इथे वाढायला लागल्या. आणि मुंबईत माणसांची गर्दीच गर्दी व्हायला लागली.

पुर्वीचा मध्यमवर्गीय मराठी माणूस उभ्या-आडव्या चाळीत रहायचा. आपण आपली नोकरी करावी. सांभाळावी. रोज संध्याकाळी टीव्हीसमोर बसावे, रविवारी दुपारी जेवणावर मनसोक्त ताव मारावा आणि संध्याकाळी दादर नाहीतर गिरगाव चौपाटीवर बायको मुलांबरोबर फिरायला न्यावे. सणाला काहीतरी गोडधोड करावे, दिवाळीला फराळ, कुटंबातल्या प्रत्येकाला नवीन कपडे करावे, उत्साही लोकांनी शैक्षणिक, सामाजीक, सांस्कृतीक मंडळे चालवावीत, पोरांनी सुट्टीच्या दिवसात रस्त्यात मैदान मांडावे. वयोवृध्दानी राजकारण्यांना, राजकारणाला, श्रीमंताना बिनधास्त शिव्या द्याव्यात, बाया-बापडयांनी घर सांभाळावे, लहानांपासुन थोरांपर्यंत सर्वानी छोटया-मोठया उत्सवात कायम मग्न असावे, हे त्याच्या आवडीचे छंद.

महाराष्ट्र दिवस आणि ड्राय डे

स्वातंत्र्यानंतर देशभर भाषीक राज्याच्या रचनेस केंद्राची मान्यता होती. मुंबईत मराठी भाषिकांची संख्या जास्त असतांनाही आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असतांनाही ती महाराष्ट्राला द्यावी की न द्यावी या संभ्रमात दिल्लीतले नेते होते. त्या कटात महाराष्ट्रातल्या राजकारणारले काही पुढारीही सामिल होते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून मुंबईला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा असे त्यांना वाटत होते. पण लेखक-पत्रकार-कलावंत-विचारवंत आणि सर्वसामान्य माणसानी सरकारविरुध्द लढा देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली. त्यात १०६ माणसांना आपले जीव गमवावे लागले. १ मे १९६० हा दिवस त्यामुळेच महाराष्ट्र दिवस आणि ड्राय डे म्हणूनही पाळला जातो.

परप्रांतीय नावाची भीती

पोटापाण्यासाठी परप्रांतातून मुंबईत आलेल्या दक्षीण भारतीय, उत्तरप्रदेशी, बिहारी, गुजराती, पंजाबी, मारवाडी यांनी पुढे पुढे मुंबईत आपले बस्तान बांधायला सुरुवात केली. हे लोक प्रामुख्याने व्यवसाय धंदा करायच्या हेतूनेच मुंबईत आले होते. सकाळच्या चहापासून रात्री झोपायच्या चादरींपर्यत प्रत्येक गोष्टींचा या माणसानी धंदा केला. मुंबईतून अमाप पैसा कमावला. मुंबईत आपली गडगंज संप्पती मिळवली, त्याच्या जोरावर सत्तेशी जवळीक साधली. काहीनी सत्ताही मिळवली. आणि आपल्याला हवे ते सुख प्राप्त करुन घेतले.

गिरणीच्या संपानंतर मुंबईत कोकणातला, देशावरचा गरीब मराठी माणूस देशोधडीला लागला. पोटापाण्यासाठी मिळेल ती नोकरी त्याने पत्करली पण वाढत चाललेल्या महागाईने तो खंगत चालला. आपल्या कुटूंबाची देखभाल करायची की आपल्या स्वप्नांची पुर्ती करायची या कैचीत तो कातरला गेला. गावाकडे निघून जावे तर गावाकडची जमीन विकलेली. ज्याची आहे त्याची कसायची सवयही गेलेली. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर अशी त्याची अवस्था झाली होती. नोकरी नाही म्हणून मुलांना चांगले शिक्षण नाही. चांगले शिक्षण नाही म्हणून पुन्हा त्यांना चांगली नोकरी नाही अश्या दुष्टचक्रात तो अडकून गेला. व्यवसाय करायचा तर पैसा नाही आणि रस्त्यावर धंदा करायचीही त्याला लाज वाटायची.

उत्तर भारतातून आलेल्या भय्या नावाच्या माणसाला तो खुप घाबरत असे. कारण तो माणूस कसाही, कुठेही, कोणत्याही परस्थीतीत तग धरुन रहायचा. त्याने आपली रोजी-रोटी छिनून घेतली असे मराठी माणसाला वाटायचे. तो अर्ध्या पगारात काम करतो. तो वाटेल तो धंदा करतो याचा त्याला राग यायचा. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची असे म्हणता म्हणता मुंबईत मराठी माणसांची संख्या शंभरात पंचवीसच्या खाली आणि भय्यांची शंभरात पन्नासच्या वर कधी गेली हे त्याला समजलंच नाही. मुंबईत अनधिकृत झोपडया वाढल्या. त्याही झोपडया पुढे अधिकृत झाल्या. मुंबईत त्या भय्यांचे इलाखे तयार झाले. पुढे पुढे ते इथले मतदार म्हणूनच हक्कदारही झाले. त्यातलेच काही नगरसेवक आणि आमदारही झाले. भविष्यात कदाचीत त्यातलाच एक महाराष्ट्राचा मुख्यामंत्रीही बनू शकतो. जादू घडावी अश्या गोष्टी त्याच्या नजरेसमोरच घडत होत्या.

चलो मुंबई(बाहेर)

पुढे पुढे मराठी माणूस विरार, बदलापूर, नवी मुंबईच्या पुढे आपला संसार थाटू लागला. तो प्रदुषणाचे, गर्दीचे कारण पुढे करी पण आपली मुंबईत रहायची लायकी नाही हे त्याला कळून चुकले होते. मराठी माणसाला आपल्या मृत्युची चाहुल लागेपर्यंत खुप उशीर झाला होता. पुर्वीपासूनच मरीन लाइन्स, मलबार हिल, पाली हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, जुहु, याकडे मराठी माणूस किंवा त्याच्या, बायका लेकी, सुना फक्त तिथे राहणार्‍या गुजराती, मारवाडी शेठ लोकांची भांडी घासायला जायच्या, तिथे राहण्याचं स्वप्न त्यानं स्वप्नातही पहीलं नाही. पण पुढे मुंबईतल्या कोणत्याही भागात उभ्या राहणार्‍या गगनचुंबी इमारतीत मराठी आडनावाचा माणूस औषधालाही सापडेनासा झाला. पण तेंव्हा खूप उशीर झालेला होता.

शेवटी शेवटी मराठी माणूस साध्या साध्या गोष्टींवरुन चिडायचा. संप करायचा. कुणाच्याही मुस्कटात मारायचा, शिव्या द्यायचा, दगडफेक, जाळपोळ करायचा. त्याचा स्वभाव चिडचिडा झाला. आपण फक्त घोषणेपुरताच उरलो आहोत अशी त्याची भावना झाली. तरीही मराठी मराठी म्हणून कुणी त्याला गोंजारलं तर त्याचा उर भरुन यायचा. मराठीच्या, मुंबईच्या अभिमानानं त्याची छाती भरुन यायची. काहीतरी केलं पाहीजे असं त्याला वाटायचं. पण पुन्हा सकाळ संध्याकाळच्या रेल्वेच्या गर्दीत आणि राईच्या तेलाच्या वासात त्याचा अभिमान बुजून जायचा.

असा होता मराठी माणूस. मनानं सात्विक, निर्मळ आणि भावनीकही होता. शेवटपर्यंत 'मुंबई माझी', 'मुंबई माझी' असा आक्रोश उर फुटेस्तोवर करीत राहीला. खाण्यापासून, सणांपर्यंत त्याच्या काही परंपरा होत्या. त्याची म्हणून एक संस्कृती होती. त्याचा म्हणून काही इतिहास होता, पण त्याची एक साधी खूणही आता मुंबईत सापडत नाही. शेवटी मेहनत आणि कष्ट केले नाहीत म्हणून मराठी माणसाचा झिजून झिजून मृत्यू झाला. त्याच्या आत्म्यास शांती लाभो

No comments:

Post a Comment