Tuesday, December 20, 2011

महाशिवरात्री

माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी सर्व शिवभक्‍त शंकराची, म्हणजे शिवाची पूजा करतात. या निमित्ताने आपण शिवाविषयी काही माहिती करून घेऊया. आपल्या संस्कृतीत विविध देवता, त्यांच्या उपासना सांगितल्या आहेत. हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन इत्यादि मूलभूत तत्त्वे आहेत, तसेच ३३ कोटी देवता या तत्त्व रूपाने आहेत. त्यांतील प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. प्रत्येक देवतेची उपासना करून आपल्याला त्या त्या देवतेशी एकरूप होता येते. महाशिवरात्रीदिवशी शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे त्या दिवशी शिवाची उपासना केल्यास त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.

`महाशिवरात्री' म्हणजे काय ?
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्‍वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्‍वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्‍तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

शिवपूजेची वैशिष्ट्ये

१. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
३. शिवपूजेत पांढर्‍या अक्षता वापरतात.
४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.
५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

शिव या शब्दाची उत्पत्ती

'शिव' या शब्दाविषयी काही माहिती करून घेऊया. 'शिव' हा शब्द `वश' या शब्दापासून अक्षरांच्या उलटापालटीने तयार झाला आहे. वश् म्हणजे प्रकाशणे. म्हणून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशी आहे. तो स्वत: प्रकाशित राहून विश्‍वालाही प्रकाशित करतो. शिव म्हणजे मंगलमय व कल्याणस्वरूप असे तत्त्व. शिव हा सत्त्व, रज व तम या तिघांना (त्रिगुणातीत करणारा) म्हणजेच अज्ञानाला एकत्रितपणे नष्ट करतो.

शिवाची इतर नावे

शंकर : शं करोती इति शंकर: । शं म्हणजे कल्याण व करोती म्हणजे करतो. जो कल्याण करतो, तो शंकर होय.

महाकालेश्वर : अखिल विश्वब्रह्मांडाचा अधिष्ठाता देव (क्षेत्रपालदेव) हा काळपुरुष म्हणजेच महाकाळ आहे. म्हणून याला महाकालेश्वर म्हणतात.

महादेव : परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण ज्ञान व परिपूर्ण साधना हे तीनही ज्याच्यात एकत्र आहेत, अशा देवास देवांचा देव म्हणजेच महादेव म्हणतात.

भालचंद्र : भाली म्हणजे कपाळी ज्याने चंद्र धारण केला आहे तो भालचंद्र. शिवपुत्र गणपतीचेही भालचंद्र हे एक नांव आहे.

कर्पूरगौर : शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे, म्हणून त्याला कर्पूरगौर असेही म्हणतात.

No comments:

Post a Comment