Sunday, December 18, 2011

दत्त जयंती


दत्त जयंती

एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्त जयंती' म्हणून साजरा करतात.



दत्त जयंतीचे महत्त्व

दत्त जयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.



जन्मोत्सव साजरा करणे

दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्‍त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच 'गुरुचरित्रसप्‍ताह' असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप आणि आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख अन चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ अन डमरू शंकराचे प्रतीक आहे.



महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. काही ब्राह्मण कुटुंबांत या उत्सवानिमित्त दत्तनवरात्र पाळले जाते आणि त्याचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो.



`श्री गुरुदेव दत्त ' या नामजपाचे महत्त्व

पूर्वजांचा त्रास असल्यास दैनंदिन जीवनात उद्‌भवणार्‍या समस्यांची काही उदाहरणे खाली दिली आहेत, उदा. परीक्षेच्या वेळी आजारी पडणे, प्रामाणिकपणे अभ्यास करूनही अपेक्षित यश न मिळणे, नोकरी न मिळणे, घरात भांडण-तंटे, लग्न न होणे, लग्न झाल्यास पती-पत्‍नीचे न पटणे, पटल्यास स्वत:मध्ये कोणतेही शारीरिक व्यंग नसतांना मूल न होणे, मूल झाल्यास मतिमंद किंवा विकलांग होणे, अपमृत्यू, धंदा न चालणे, दारिद्र्य, शारीरिक आजार अशा समस्या उद्‌भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिदिन 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप न्यूनतम (किमान) १०८ वेळा लिहावा. तसेच मोठ्यांना हा त्रास असल्यास रोज किमान १ घंटा तरी `श्री गुरुदेव दत्त' हा नामजप करावा. त्रासाच्या तीव्रतेनुसार हा नामजपाचा कालावधी वाढवावा.



दत्त अवतार - दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले व पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.



`श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार व `श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय. तसेच `माणिकप्रभु' तिसरे व `श्री स्वामी समर्थ महाराज' हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे `नेमिनाथ' म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात' पहातात. दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत.



दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका व औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. `श्री गुरुदेव दत्त', `श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात. `दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.



दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात व तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.

No comments:

Post a Comment